अन् चालत्या विमानात प्रवाशाच्या मोबाईल फोनने घेतला पेट; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

दिब्रुगढ ते दिल्ली या मार्गावरील चालत्या विमानात एका प्रवाश्याच्या मोबाईल फोनने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. इंडिगोच्या विमानामध्ये ही गुरुवारी घटना घडली आहे. विमानातल्या कर्मचाऱ्यांनी ही आग योग्य वेळी विझवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेमध्ये प्रवासी अथवा विमानातल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही कोणतीही इजा झालेली नाही, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्लाइट 6E 2037 दिब्रुगडहून दिल्लीला जात असताना केबिन क्रू सदस्याला प्रवाशाच्या फोनमधून ठिणग्या आणि धूर निघताना दिसला.

त्यानंतर केबिन क्रू सदस्याने अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विझवली, असे त्यांनी नमूद केले. गुरुवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं, असंही त्यांनी सांगितलं.

इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिब्रुगढ ते दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट 6E 2037 मध्ये मोबाईल डिव्हाईसमधून धूर आल्याची घटना घडली होती. क्रूला धोकादायक घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं आणि त्यांनी त्वरीत परिस्थिती हाताळली. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *