एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना आगीचा भडका उडाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
अंबरनाथमधील ठाणे बुवापाडा परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये राहुल नावाच्या एका तरूणाचा वाढदिवस साजरा केला जातोय. यासाठी केकवर हल्ली वापरला जाणारी स्पार्कल कँडल लावण्यात आली. ती पेटवून तरुणाच्या तोंडात धरण्यासाठी मित्रांकडून आग्रह करण्यात आला. यानंतर या तरुणावर अंडी फेकून मारण्यात आली. त्यामुळे तोंडातील जळत असलेली कँडल त्या तरुणाने हातात पकडली.
त्यानंतर तरुणाच्या अंगावर त्याच्या एका मित्राने पीठ टाकलं. मात्र यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. ज्यात वाढदिवस असलेला मुलगा चांगलाच होरपळून निघाला. या घटनेबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
राहुल नावाचा हा तरुण बुवापाडा परिसरात नेमका कुठे राहतो? हे अद्याप समजू शकलेलं नसून या व्हिडीओनंतर हल्लीच्या तरुणांची वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत जीवावरही कशी बेतू शकते? हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
