संजय राऊत यांचं मुंबई विमानतळाबाहेर जंगी स्वागत करण्यात आलं. राऊत दिल्लीवरून येणार म्हणून मुंबई विमानतळाबाहेर शिवसैनिकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. संजय राऊत मुंबई विमानतळाबाहेर दाखल होताच ढोल-ताशे वाजवून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर संजय राऊत यांची फुलांनी सजवलेल्या गाडीतून जंगी रॅली काढण्यात आली.
‘तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई केली जातेय. मात्र भाजपवाले स्वतःचीच कबर खोदत आहेत. अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी हा आक्रोश असल्याचं सांगितलं.
‘आम्हाला तुरूंगात टाका, खुनी हल्ले करा, ठार मारा… पण त्यातून तुम्ही तुमचीच कबर खोदताय. पुढची २५ वर्षं महाराष्ट्रात तुमचं राज्य येणार नाही… असंही राऊतांनी बजावलं… विक्रांतचे पैसे लाटणा-या किरीट सोमय्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
