पाऊस वीस दिवस आधीच गाशा गुंडाळायला घेणार

पाऊस वीस दिवस आधीच गाशा गुंडाळायला घेणार

गेले तीन महिने चकवा दिलेला पाऊस सप्टेंबरमध्ये जोरदार कोसळून जनतेला दिलासा देईल, अशी उरलीसुरली आशाही भारतीय हवामान खात्याच्या बुधवारच्या अंदाजाने मावळली आहे. यंदा ८८ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाऊस आपला गाशा गुंडाळायला घेणार आहे. त्यामुळे देशात भीषण दुष्काळाचे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ प्रवाहाच्या परिणामामुळे देशात पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. गेले तीन महिने सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच खरीप हंगामातील पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा ऑगस्ट महिना हा गेल्या दहा वर्षातील सर्वात कोरडा महिना ठरला. सप्टेंबरमध्ये पावसाचा तुरळक अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडयापासून पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने निराशा केल्याने २००९नंतर यंदाचे वर्ष हे सर्वात कोरडे ठरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मण सिंग राठोड यांनी सांगितले.

जूनमध्ये धो धो कोसळत रेकॉर्ड मोडणा-या वरुणराजाने जुलैपासून मुंबईसह राज्यात पाठ फिरवली. ‘एल निनो’ या प्रशांत महासागरात तयार होणा-या उष्ण पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम पावसावर झाला असून देशातील बहुसंख्य भाग दुष्काळाने होरपळून निघाला असून मुंबई आणि राज्यातील इतर भागांवर दुष्काळाचे सावट आहे. ‘स्कायमेट’ या खासगी वेधशाळेच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये सरासरी ३१२ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा केवळ ९० मि.मी.च्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत

कोकण-गोव्यात दमदार एन्ट्री केलेला पाऊच एकाएकी गायब झाल्याने आभाळाकडे डोळे लावून बघण्याशिवाय शेतक-यांना पर्याय उरलेला नाही. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र पावसाअभावी होरपळून निघाला आहे. या दुष्काळग्रस्त परिस्थितीत टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा न झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *