मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी राज ठाकरेंनी जाहीरपणे हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडताना मशिदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. दरम्यान त्यांच्या या विधानावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच पक्षाला धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली आहे. यावर पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ आणि प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी केलेल्या विधानानंतर राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे.
या राजीनाम्याबाबत माजिद शेख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “मी २००९ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत असून शाखा अध्यक्ष आहे. माझ्या प्रभागात हिंदू-मुस्लिम एकत्रित राहतात. मी माझ्या भागात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून त्यामुळे मी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे”.
पक्षाची प्रतिक्रिया –
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैसमज करुन देतात त्यातून हे झालं असावं. पण यातून मार्ग निघेल”.
“राज ठाकरेंनी कोणत्याही प्रार्थनेला विरोध नाही, ती कऱण्याचा प्रत्येकाला हक्क असून त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये असं स्पष्ट सांगितलं होतं. जर लोक त्याची काळजी घेणार असतील तर आमचं काहीच म्हणणं नाही,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
आव्डाह यांनी द्वेष परसवू नका अशी विनंती केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “१९९९ साली पक्ष स्थापन झाल्यापासून मराठा-ब्राह्मण, मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातींमध्ये भांडणं लावली त्यांनी अक्कल शिकवू नये. महाराष्ट्राची काळजी राज ठाकरेंना सर्वात जास्त आहे आणि आव्हाडांपेक्षा जास्त आहे”.
दरम्यान गृहमंत्र्यांनी मर्यादा पाळण्याचं आवाहन केल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना मला एकच सांगायचं आहे की आम्हाला अक्कल शिकवण्याआधी आपण किती जातींमध्ये, कोणामध्ये भांडणं लावली याचा विचार करावा. राज ठाकरेंना महाराष्ट्राची काळजी आहे, त्यामुळे कोणती गोष्ट कशी बोलायची, हाताळायची आम्हाला कळतं. त्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं. जर कायद्यात ५० डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको असा नियम असेल तर त्याचं पालन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे”.
