श्रीलंकेतील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ३६ तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.
रविवारी होणाऱ्या या नियोजित आंदोलनापूर्वी, आठवडाअखेर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भंग करून, आपले नेते साजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार शनिवारी कोलंबोतील ‘स्वातंत्र्य चौकाकडे’ निघाले होते.
जनतेला निदर्शने करण्याचा हक्क नाकारण्यासाठी सार्वजिनक सुरक्षा अध्यादेशाचा सरकार दुरुपयोग करत असल्याबद्दल आम्ही विरोध व्यक्त करत आहोत’, असे प्रेमदासा म्हणाले.देशातील सध्याचे आर्थिक संकट आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे लोकांना सोसावा लागणारा त्रास यांच्या विरोधात समाजमाध्यम कार्यकर्त्यांनी ही निदर्शने आयोजित केली होती.
देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी एकूण ६४४ लोकांना अटक करण्यात आली. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘अरब स्प्रिंग’ धर्तीवरील निदर्शनांपूर्वी देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती, असे वृत्त ‘कोलंबो गॅझेट’ने दिले.