ऑनलाइन परीक्षेची मागणी धोक्याची घंटा ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे मत

करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घ्या, असे म्हणणे म्हणजे धोक्याची घंटा आहे. यातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. ऑफलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे आपली जबाबदारी आहे. विद्यार्थिनींनी ऑफलाइन शिक्षणाची चळवळ उभारावी, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी मांडले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्नित बी. सी.ए आणि बी. डिझाइन पदवी अभ्यासक्रमाच्या दीक्षान्त समारंभात सामंत बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, विद्या कुलकर्णी, मल्लिका सामंत, समीक्षा निकम आदी या वेळी उपस्थित होते. ६५० विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे, ही शासनाची भूमिका आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उच्च शिक्षण सर्वाना उपलब्ध करून देण्यासोबत शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात येत आहे. संस्थेचे ३६ कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले.

‘परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून माझी ओळख’
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काम करताना गेल्या दोन वर्षांत परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून माझी ओळख झाली. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी परीक्षा रद्द करणारा मंत्री आला असेच म्हटले जात असल्याचे सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *