ताडोबात टी १६१ वाघाचा मृत्यू

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रेडिओ कॉलर लावलेला सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी १६१ नर वाघ कारवा रेंजच्या वनखंड क्रमांक २९० मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाघाच्या गळ्यातील रेडिओ कॉलर काढण्यासाठी वनविभागाकडून २०१९ पासून प्रयत्न सुरू होते. परंतु त्यात यश आले नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये मिळालेल्या छायाचित्रात वाघाच्या गळ्याभोवती जखम दिसून आली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, शोध पथकाला बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी त्याचा मृतदेह नाल्यात आढळला. गळ्याभोवतीच्या जखमेमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षावरून सांगितले जात आहे. वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे, असे ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *