लोणावळ्यात धूम्रपान बेतलं जीवावर; मधमाशांनी घेतला तरुणांना चावा

धूम्रपान हे करणाऱ्या व्यक्तीच्या शरिरासाठी हानिकारक असताना ते इतरांच्या जीवावर बेतू शकतं. अशीच काहीशी घटना लोणावळा परिसरात घडली आहे. भोसरी आणि रावेत येथील अकरा जणांचा ग्रुप भटकंती करायला गेला होता. हे तरुण आणि तरुणी कातळधार धबधब्याच्या दरीत उतरले होते. तिथे काही जणांनी धूम्रपान केलं. याचा धूर धबधब्याच्या खडकांवर असणाऱ्या मोहोळापर्यंत पोहचला आणि तरुण आणि तरुणींवर मधमाशांनी हल्ला चढवला. यामध्ये अकरा पैकी पाच जणांना मधमाशांनी कडाडून चावा घेतला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. दरम्यान, शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तात्काळ पोहचत या हल्ल्यातून त्यांची सुटका केली.

पिंपरी-चिंचवडमधील अकरा जणांचा ग्रुप लोणावळ्यातील कातळधार धबधब्याच्या परिसरात भटकंती करण्यास गेला होता. दरीत पोहचताच काही जणांनी धूम्रपान करण्यास सुरू केले. धूम्रपानाचा धूर खडकावर असणाऱ्या मोहोळाच्या मधमाशांपर्यंत पोहचला आणि थेट त्यांनी सर्वांवर हल्ला चढवला. यात बहुतांश जणांना मधमाशांनी कडाडून चावा घेतला. हे पाहताच यापैकी एकाने याची माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीमला दिली.

शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने येऊन सर्वांचे रेस्क्यू केलं. मात्र, काही तरुण आणि तरुणींना मधमाशांनी चावा घेतल्याने चालता येत नव्हतं. एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला. या घटनेनंतर तातडीने पाच जणांना लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली असून हे सर्व आयटी अभियंते असल्याचं समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *