हिंगोली तालुक्यातील नरसी येथे रात्रीच्या सुमारास हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
नरसी शिवारातील गट क्रमांक ७३८ संजना बबन सावंत यांची दोन एकर मधील हरभरा गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे शेतकरी बेसावध असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. यामध्ये संजना बबन सावंत यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सद्या या प्रकरणी पोलिसाना माहिती दिली असुन अद्याप तरी कोणत्याही गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती. संजना सावंत यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसंच, उभ्या शेतातील पिक जळल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
धुके, ढगाळ वातावरण यामुळे यंदा हरभरा पिकाचे उत्पादन मध्ये मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी बेसावधपणे असल्याने जमा केलेल्या पिकाला आग लावल्याचे यापूर्वीही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अश्या लोकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे.
