राज्यात करोनाचे २२५ नवे रुग्ण ; एप्रिल २०२० नंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येत एवढी घट

राज्यात सोमवारी २२५ रुग्ण नव्याने आढळले असून एप्रिल २०२० नंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

करोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृतांचा आलेखही वेगाने खाली जात आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी झाली तरी अडीचशेच्या खाली कधीच गेली नव्हती, तर मृतांचे प्रमाणही शून्य झाले नव्हते. तिसऱ्या लाटेनंतर मात्र करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे.

राज्यात २२५ नवे रुग्ण आढळले आहेत. एप्रिल २०२० पासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार होत होते. परंतु प्रथमच एवढी कमी रुग्णसंख्या झाली आहे. राज्यात सोमवारी मुंबई, नगर आणि पुणे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. राज्यात सोमवारी एकही करोना मृत्यू नाही.या महिन्यात राज्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यू आढळले आहेत.

मुंबईत ३८ नवे रुग्ण मुंबईत सोमवारी ३८ नवे रुग्ण आढळले असून एप्रिल २०२० नंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच सोमवारी शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत मार्चमध्ये केवळ रविवार वगळता अन्य सर्व दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *