राज्यातील पूर्वप्राथमिक व प्राथमिक प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार खेळगटासाठी चार वर्ष पाच महिने ३० दिवस, कनिष्ठ गटासाठी पाच वर्षे पाच महिने ३० दिवस, वरिष्ठ गटासाठी सहा वर्षे पाच महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी सात वर्षे पाच महिने ३० दिवस ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून या वयापेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाऐवजी पुढील वर्गात प्रवेश देण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या संदर्भात माहिती दिली. ३१ डिसेंबर २०२२ रोजी खेळ गटात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ गटासाठी पाच वर्षे पाच महिने ३० दिवस, वरिष्ठ गटासाठी सहा वर्षे पाच महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी सात वर्षे पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वयोमर्यादेसंबंधीची माहिती
सर्व शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी या परिपत्रकानुसार शाळांना सूचना द्याव्यात. वयोमर्यादेवरून शिक्षण विभागात अनेक तक्रारी येतात. या तक्रारी न येण्यासाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नवे काय?
यापूर्वी कमाल वयाची मर्यादा ठरवण्यासाठी जून महिना मानक होता. मात्र, जुलै ते डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना एक वर्ष विलंबाने प्रवेश मिळत असल्याचे लक्षात घेऊन आता प्राथमिक शिक्षण विभागाने ३१ डिसेंबर ही मानीव तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा घालून देण्यात आली आहे.
आरटीई अर्जासाठी मुदतवाढ
राज्यातील आरटीई प्रवेशासाठीच्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आता १० मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शाळा नोंदणीस विलंब झाला. त्यामुळे पालकांना अर्ज करता आला नाही. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला.
