शँपेनचं झाकण उघडताना चूक, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ

शँपेनचं झाकण उघडताना चूक, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ

शँपेनचे घोट रिचवून प्रवासाचा आनंद घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या लंडन-टर्की विमानातील प्रवाशांना ते स्वप्नच महागात पडलं. सळसळत्या शँपेनचं झाकण उडून निर्माण झालेल्या स्थितीमुळे विमानाचं इटलीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

इझीजेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या इच्छेनुसार एअर हॉस्टेसने शँपेन आणली. शँपेनची बाटली उघडण्याची विशिष्ट पद्धत असते, मात्र त्याप्रकारे उघडताना काहीशी गल्लत झाली आणि झाकण उडून विमानाच्या सीलिंग पॅनेलवर आपटलं. त्यामुळे इमर्जन्सी केसमध्ये आपोआप खाली येणारे ऑक्सिजन मास्क अचानक प्रवाशांच्या चेहऱ्याजवळ आले.

ऑक्सिजन मास्क खाली आल्याने रिपेअरसाठी पायलटला इमर्जन्सी लँडिंग करणं भाग पडलं. हा प्रकार घडला तेव्हा लंडन ते टर्कीमधील दलमान या 4 तासांच्या विमानातील अर्धा प्रवास झाला होता.

हा प्रकार ऐकताना हास्यास्पद वाटत असला, तरी विमानात बसलेल्या आम्हा प्रवाशांसाठी तो निश्चितच तसा नव्हता, अशी प्रतिक्रिया संबंधित विमानातील प्रवाशाने व्यक्त केली. इझीजेटच्या EZY8845 लंडन-टर्की विमानाचं तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झालेल्या ऑक्सिजन मास्कच्या रिपेअरसाठी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *