पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला,

नेमकं काय झालं होतं ?

कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *