धावत्या एक्स्प्रेसमध्ये ५ लुटारूंना बेड्या

धावत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला प्रवाशाच्या सतर्कतेमुळे कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून या गुन्हेगाराच्या इतिहासाचा पोलिस शोध घेत आहेत.

वसई येथे राहणाऱ्या जया पिसे ही महिला आपल्या मुलीसमवेत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून सोलापूर ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. २७ जानेवारी रोजी एक्स्प्रेस कर्जत स्थानकाजवळ पोहोचताच बोगीत काही प्रवाशांनी चोरचोर असा आरडाओरडा सुरू केला. या गोंगाटामुळे जया यांनी आपल्या बॅग कवटाळून धरली. याच दरम्यान चार ते पाच जण त्यांच्याजवळ आले त्यांची सामानाने भरलेली त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जया यांनी त्यांना तीव्र प्रतिकार केला असता एकाने चाकूचा धाक दाखवीत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. मात्र ही झटापट सुरू असताना एका सतर्क प्रवाशाने १०० नंबरवरून पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली. तत्काळ नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती देताच याच गाडीत ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांना कल्याण रेल्वे पोलिसाच्या ताब्यात दिले. याबाबत कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा परिसरात राहणारे आहेत. तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे निजान शेख यांच्यासह एका १४ वर्षीय मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे. कल्याण रेल्वे न्यायालयासमोर या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींचा पूर्व इतिहास तपासला जात असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे काही गुन्हा केला आहे का, हे चौकशीअंती स्पष्ट होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *