सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय दुर्देवी! अण्णा हजारेंचं जाहीर पत्र

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सुपरमार्केटमधून वाईन विक्री हा निर्णय दुर्दैवी असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं हित पाहायचचं असेल तर शेतीमालाला सरकारनं हमी भाव द्यायला हवा. खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केल आहे. यासंदर्भात त्यांनी एक जाहीर पत्रच लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल.

एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.

वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *