चेंबूरमध्ये बेपत्ता म्हणून नोंद असलेली महिला तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून खाली पडत असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत झाले असून यानंतर ही महिला आणि हे बालक मृत्यू पावले. या महिलेने आत्महत्या केली असावी, की हा खूनाचा प्रकार असावा, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
श्रुती महाडिक (३७) असे मृत महिलेचे नाव असून ती कुर्ला येथे मुलगा राजवीर महाडिक आणि पतीसह राहत होती. बुधवारी ही महिला आणि मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाले. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती. शुक्रवारी दुपारी या महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह तिचे आई वडील वास्तव्यास असलेल्या चेंबूरमधील ‘अल्टावीस्टा’ इमारतीच्या आवारात सापडला.
स्थानिक रहिवाशांनी याची माहिती दिल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी असता बुधवारी ही महिला इमारतीवरून खाली पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. मात्र ही आत्महत्या आहे,की हत्या याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
