ग्रामीण भाग पुन्हा करोना सावटाखाली ; मुंबई परिसराबरोबरच नाशिक, नागपूर, सातारा, नगरमध्ये रुग्णवाढ

राज्यात ओमायक्रॉनची तिसरी लाट सध्या प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये थैमान घालत असली तरी याचा प्रसार आता हळूहळू अन्य जिल्ह्यांमध्येही होत आहे. राज्यात सध्या २ लाख २१ हजार उपचाराधीन रुग्ण असून, यातील सुमारे ८९ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आहेत. या पाठोपाठ आता नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबाद येथीलही रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मागील दोन दिवस घट होत असली तरी या महिन्यांत सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे २८ हजारांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे १ हजार ४१२ वर होते.  ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठवडाभरात जवळपास तीनपटीने वाढली आहे. ४ जानेवारीपर्यत राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन होते. ११ जानेवारीपर्यत ही संख्या २ लाख २१ हजारांवर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *