गरोदर असल्याचं भासवणाऱ्या महिलेचं पितळ, हैदराबादच्या डॉक्टरांच्या पथकाने उघडं पाडलं आहे. धक्कादायक म्हणजे महिला गरोदर नव्हती, तर तिने आपल्या पोटात चक्क अंमली पदार्थांची 40 पाकिटं लपवल्याचं समोर आलं आहे. तस्करीच्या उद्देशाने तीने ही शक्कल लढवली होती.
मुसीया मूसा असं या 32 वर्षीय महिलेचं नाव असून, ती दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे.
मुसीया ही दुबईहून हैदराबादला तस्करीचं ड्रग्ज घेऊन आली होती. मुसीया हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. त्यावेळी तिला चालण्यासाठी त्रास होऊ लागला. विमानतळावरील पोलिसांनी तिची चौकशी केली असता, आपण सात महिन्यांची गरोदर असल्याचं तीने सांगितलं.
मात्र संशय आल्याने पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मग पुन्हा उस्मानिया रुग्णालायत नेऊन तिच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला.
या महिलेच्या पोटात तब्बल 40 ड्रग्ज पाकिटं आढळली. ज्याची किंमत सुमारे एक कोटीच्या घरात आहे.
दरम्यान, पोलिस तिची अधिक चौकशी करत असून, मुसिया ही ड्रग्ज पाकीटं कोणाला देणार होती याचा तपास करत आहेत.

