गोव्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अर्थात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची राळ अनुभवण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. मात्र, या राजकीय कलगीतुऱ्याऐवजी गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये सौहार्दाचं वातावरण दिसू लागलं आहे. याला निमित्त ठरलाय गोव्यातील सत्ताधारी भाजपाचा एक निर्णय! त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्या गोवा सरकारच्या या निर्णयावरून दोन्ही पक्षांमधलं तणावपूर्ण वातावरण काहीसं निवळण्याची शक्यता आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी नुकतीच गोवा विधानसभेत आमदार म्हणून कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण केली. ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची आणि कामगरीची परतफेड म्हणून गोव कॅबिनेटनं त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गोव्याच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर दिली आहे.
