धनगर समाजाच्या आरक्षणावरून आणि राज्यात सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपात पुढाकार घेऊन राज्य सरकारला अडचणीत आणणारे भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हेच सध्या अडचणीत सापडले आहेत.
विकलेल्या शेत जमिनीचे पैसे न दिल्याबद्दल आटपाडी पोलिसांनी आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर यांच्याविरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. शेतकरी महादेव अण्णा वाघमारे (रा. झरे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झालाय.
काय आहे प्रकरण ?
झरे येथील शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांची बहीण यांच्या अकरा एकर शेत जमीनीचा व्यवहार आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांच्याशी 2008 मध्ये ठरला. दहा लाख पन्नास हजारांच्या या व्यवहारासाठी पडळकर यांनी एक लाख रुपये दिले होते.
प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार हा दहा लाख पन्नास हजार इतके ठरला असताना पडळकर बंधु यांनी उर्वरित रक्कम ४ लाख 75 हजार रुपये देण्याचे टाळून फसवणूक केली. उलट त्यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर चालू ठेवला, असा आरोप शेतकरी वाघमारे यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.
या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून आमदार पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
