राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख ७६ हजार मुलांना लसलाभ मिळाला. लसपात्र मुलांपैकी २.९ टक्के मुलांचे लसीकरण पहिल्याच दिवशी झाले.
करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, तिसऱ्या लाटेच्या सावटाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाल़े पहिल्याच दिवशी मुलांचा लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला.
राज्यात सोमवारी सायंकाळी साडेसहापर्यंत १ लाख ७६ हजार ५५२ मुलांचे लसीकरण झाले. राज्यभरात या वयोगटातील सुमारे ६० लाख मुले पात्र असून, यातील २.९ टक्के मुलांचे लसीकरण झाले.
नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने सोमवारी प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी अनेक केंद्रांवरील वेळा आधीच आरक्षित झालेल्या होत्या. खासगीसह पालिकेच्या केंद्रांवर १८ वर्षांवरील लसीकरणाच्या नोंदणीसाठीच्या वेळा उपलब्ध आहेत. परंतु १५ ते १८ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाच्या वेळा आरक्षित झालेल्या असून उपलब्ध नाहीत. केंद्रांच्या नियमावलीनुसार या वयोगटातील बालकांसाठी कोव्हॅक्सिन लशीलाच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पुढील २८ दिवसांतच या मुलांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण होणार आहे.
ठाण्यात सर्वाधिक लसीकरण
राज्यभरात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १९ हजार ८२९ मुलांचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. या खालोखाल पुण्यात १७ हजार २७६, नगरमध्ये १६ हजार १२७ तर सांगलीमध्ये १४ हजार ४५० मुलांना लस देण्यात आली. मुलांच्या लोकसंख्येनुसार, सांगलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल धुळे, नगर, पालघर, कोल्हापूर, बीड, यवतमाळ आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
