मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई; जाणून आदेशात काय म्हटलंय

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होऊ लागलीय. बुधवारी मुंबईमध्ये करोनाचे दोन हजार ५१० नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केलीय. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाहीय. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे.

वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील पार्ट्यांवर बंधन घातल्यानंतर आता रेस्तराँ, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कोणत्याही मोकळ्या अथवा बंदिस्त जागांवर ३० डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त एकत्र येण्यास परवानगी नाकारण्यात आलीय.

“३० डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री बारापासून सात जानेवारीच्या मध्यरात्री बारावाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागांवर हा आदेश लागू असेल,” असं नमूद करण्यात आलंय. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरतील. याशिवाय महामारी कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि इतर कायद्यांखाली कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *