मुंबईसह राज्यात करोना रुग्णआलेख पुन्हा उंचावला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील ४९० जणांसह राज्यात १२०१ नव्या रुग्णांची नोंद झाली. जवळपास महिन्याभराने राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येने हजारचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येने ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ४०० चा टप्पा पार केला.
आठवड्याभरात मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या जवळपास ३०० ने वाढली. त्याखालोखाल पुण्यात या आठवड्यात २२७ उपचाराधीन रुग्ण वाढले आहेत. नाशिकमध्येही रुग्णसंख्या वाढत असून, गेल्या आठवड्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ११२ ने भर पडली. सांगली, सातारा आणि रायगड येथेही रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे.
राज्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही किंचित वाढले आहे. पुण्यात बाधितांचे प्रमाण आठवड्याभरात १.६४ टक्क्यांवरून १.७५ टक्क्यांवर गेले. सांगली, सोलापूर, सातारा, नगर आणि नाशिकमधील बाधितांचे प्रमाण एका टक्क्यापेक्षाही कमी होते. ते आता एका टक्क्याहून अधिक झाले आहे.
राज्यात सध्या सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ पुणे (१९१२), ठाणे (१०३५), नाशिक (४४६) आणि नगर (३५६) या जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ६५ वर पोहोचली आहे.
सध्या लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसत असली तरी बाधितांचे प्रमाण अजून चिंताजनक म्हणण्याइतके नाही. मात्र, चाचण्या आणि लसीकरणावर आणखी भर द्यायला हवा
