करोनावर उपचारासाठी फायझरने आणली गोळी; १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देता येणार

जगभरात करोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याने आरोग्य सेवेशी संबंधित लोकांची चिंता वाढली आहे. तर, सर्वसामान्य माणूसही भीतीच्या सावटाखाली जगतोय. सध्या तरी केवळ लसीकरणामुळे माणूस करोनापासून सुरक्षित राहू शकतो. याशिवाय औषध निर्मिती आणि लसींची निर्मिती जगभरात सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी मोठा निर्णय घेतला. एफडीएने करोनापासून संरक्षण करण्यासाठी १२ वर्षे वयोगटातील आणि त्याहून अधिक वयाच्या जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या गोळीला मान्यता दिली आहे.

फायझरच्या या औषधाला Paxlovid म्हणतात. या औषधाची २२०० लोकांवर चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या लोकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्क्यांनी कमी केल्याचे दिसून आले. फायझरच्या या उपचारांना यापूर्वी युरोपियन युनियनमध्ये मान्यता दिली गेली आहे. अमेरिकेने या औषधाच्या १ कोटी डोससाठी आधीच पैसे दिले आहेत. लक्षणे दिसू लागल्यानंतर लगेचच या गोळ्या पाच दिवसांसाठी दर १२ तासांनी घ्यायच्या असतात.दरम्यान, ओमायक्रॉनचे अमेरिकेतही रुग्ण वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. करोनावर  उपचारासाठी औषधं तयार करण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडे मर्कने विकसित केलेली आणखी एक कोविड गोळी लोकांच्या उपचारासाठी वापरण्यात येत आहे. ती गोळी देखील रुग्णाला पाच दिवसांसाठी दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *