महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस अटक; माथेरान खून प्रकरणाची २४ तासांत उकल

माथेरान येथील खून प्रकरणाची २४ तासांत उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. पतीकडून या महिलेची निघृण हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला जेरबंद करण्यातही पोलिसांना यश आले आहे.

रविवारी सकाळी माथेरान येथील इंदिरा नगर परिसरात एका खाजगी लॉजमध्ये शीर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळून आला होता. अतिशय क्रूरपणे या महिलेची हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते, तर महिलेच्या हातावर गोंदलेले नावही नष्ट करण्यात आले होते. या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आठ पथकांच्या मदतीने पोलीस तपास सुरू करण्यात आला होता.

सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी लॉजमध्ये राहायला आलेल्या जोडप्याचे फोटो मिळवले. त्यानंतर पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर झुडपात एक बॅग आढळून आली. या बॅगमध्ये गोरेगावचा पत्ता असलेली दवाखान्याची एक चिठ्ठी सापडली. यानंतर पोलिसांनी गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेव्हा गोरेगाव येथून पूनम पाल ही महिला बेपत्ता असल्याचे समोर आले. ती आपल्या पतीला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तपासाला दिशा मिळाली. शीर नसलेला मृतदेह तिचाच असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती  हा तिचापतीच असल्याचेही समोर आले. त्यामुळे त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. तपासाची चक्रे फिरवून त्याला पनवेल येथून ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *