चार सोसायट्यांमधील फ्लॅट फोडले

कात्रजमधील वंडर सिटी परिसरातील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी याच परिसरातील आणखी तीन सोसायट्यांमधील फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिलींद साठे (वय ५८, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेल्या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात वंडर सिटी सोसायटीतील ‘जे’ इमारतीमध्ये तक्रारदार यांचा फ्लॅट आहे. या ठिकाणी तक्रारदार यांची आई राहते. सध्या फ्लॅट बंद आहे. चार डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास चोरटे मोटारीतून सोसायटीत शिरले. त्यांनी साठे यांच्या आई राहत असलेल्या फ्लॅटचा सेफ्टी दरवाजाचा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील १७ हजारांची रोकड, दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांना घरफोडीचा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वंडर सिटीबरोबर या परिसरातील सुनीता रेसीडन्सी, तोरणा सोसायटीमधील प्रत्येकी दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. या सोसायट्यांमधील घरफोड्यांत चोरट्यांना काहीही हाती लागलेले नाही. तर, करण भारती सोसायटीत एका गाडीचे चोरट्यांनी नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता अधिक तपास करीत आहेत.

घरफोडीसाठी वापरलेली कार चोरीची
वंडर सिटी व इतर तीन सोसायट्यांमध्ये घरफोड्या करण्यासाठी चोरटे एका कारमधून आल्याचे वंडर सिटी सोसायटीमधील ‘सीसीटीव्ही’त दिसत आहे. गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची असून, ती तीन दिवसांपूर्वी निगडीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांनी चेहऱ्याला मास्क लावल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत. या कारमध्ये दोन; अथवा तीन चोरटे असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *