राज्यात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण ; पुणे-पिंपरीमध्ये सात जणांना लागण झाल्याचे स्पष्ट

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचे पुणे-पिंपरीमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे.

नायजेरियातील ४५ वर्षीय महिला तिच्या बारा आणि अठरा वर्षांच्या मुलींना घेऊन २४ नोव्हेंबरला भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली होती. त्यांची व निकटच्या संपर्कातील १३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात नायजेरियातून आलेल्या तिघींसह या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड व सात वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने रविवारी सायंकाळी दिला. या सर्वाना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वाची प्रकृती स्थिर आहे. सहा जणांपैकी नायजेरियातून आलेल्या महिलेला सौम्य लक्षणे असून, अन्य पाच जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. या बाधितांपैकी तिघे १८ वर्षांवरील असल्याने त्यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *