‘नासा’ने सुरू केला मंगळावर राहण्यासाठी सराव

‘नासा’ने सुरू केला मंगळावर राहण्यासाठी सराव

अमेरिकन अवकाश संस्था ‘नासा’ने मंगळावर वास्तव्य करण्यासाठी सराव सुरू केला असून त्यासाठी ‘नासा’च्या सहा जणांच्या चमूने वर्षभरासाठी एका निर्जन बेटावर मुक्काम ठोकला आहे. याठिकाणी त्यांना ताजी हवा, अन्न या गोष्टींपासून दूर राहून मंगळावर जसे वातावरण आहे, तशा वातावरणात राहण्याचा सराव होणार असून मंगळावर मानव राहू शकतो का? याचा अभ्यास करण्यासाठी ही पूर्वतयारी असल्याचे ‘नासा’च्या सूत्रांनी सांगितले आहे.

हवाई बेटांवरील एका मृत ज्वालामुखीजवळ हा चमू राहत असून त्याठिकाणी उभारलेल्या एका खास तंबूमध्ये त्यांचा मुक्काम आहे. सुमारे वर्षभर हा चमू येथे राहणार असून मंगळावर राहताना काय काय अडचणी येऊ शकतात? आणि त्यातून कसा मार्ग काढावा? याचा सराव येथे होणार असल्याचे समजते. या चमूमध्ये शास्त्रज्ञ, वैमानिक, अभियंता आणि पत्रकार अशा सहा जणांचा समावेश असून अशाप्रकारे मृत ज्वालामुखीच्या बाजूला राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सहा जणांमध्ये फ्रान्स आणि जर्मनीचा प्रत्येकी एक आणि अमेरिकेच्या चार जणांचा समावेश आहे. हवाई बेटावरील या चमूच्या मुक्कामाला नुकतीच सुरुवात झाली असून या सर्वानी जगाशी असलेला आपला संपर्क तोडला आहे. शिवाय तंबूबाहेर जाण्यासाठीही त्यांना अवकाशात वापरल्या जाणा-या स्पेससूटचा वापर करावा लागणार असून या सर्वाना वर्षभर पुरतील इतक्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्न पुरविण्यात आल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ‘नासा’ने चंद्रावर निवारा उभारण्याची योजना आखली असून ती लवकरच अमलातही येणार आहे. त्यानंतर ‘नासा’चे मंगळावर राहण्याचे लक्ष्य असल्याचे या नव्या सरावातून स्पष्ट झाले असून प्रत्यक्षात ही योजना कधी राबवण्यात येईल, याबाबतची माहिती मात्र ‘नासा’ने दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *