नवीन पद्धतीच्या लेन्समुळे गोरगरीब वृद्ध नेत्ररुग्णांना तरुणांसारखी स्पष्ट दृष्टी मिळणार

नवीन पद्धतीच्या लेन्समुळे गोरगरीब वृद्ध नेत्ररुग्णांना तरुणांसारखी स्पष्ट दृष्टी मिळणार

मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्यानंतर ‘बायफोकल लेन्स’ बसूनही अनेकदा व्यक्तींना दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. मात्र, नवीन पद्धतीच्या लेन्समुळे गोरगरीब वृद्ध नेत्ररुग्णांना तरुणांसारखी स्पष्ट दृष्टी मिळणार आहे. भारतात या नवीन लेन्सचा वापर करून मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील दोन रुग्णांना या लेन्स बसवण्यात आल्या आहेत.

भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. मात्र, इथेच न थांबता दररोज प्रत्येक एका रुग्णावर अशाप्रकारची शस्त्रक्रिया करून लेन्स बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर वृद्धांना चष्मा न लावताच पाहता येणार आहे.

विशेषत: मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी ‘मोनो फोकल्स’ व ‘मल्टी फोकल्स’ या दोन प्रकारच्या लेन्स वापरल्या जातात. यातील मोनो फोकल्स लेन्सद्वारे रुग्णांला ठरावीक अंतरावरीलच दिसते. दूर अंतरावरील गोष्टी भुरकट दिसतात. तर मल्टी फोकल्स लेन्समध्ये निश्चित केलेल्या अंतरामुळे जवळचे व दूरचेही दिसते. परंतु, अनेकदा काही गोष्टी अस्पष्ट दिसतात. जसे, संगणक किंवा मोबाईलचा वापर करताना तसेच पुस्तक वाचताना डोळ्यांना त्रास होतो, गाडी किंवा दुचाकी चालवता समोरच्या गोष्ट अस्पष्ट दिसतात.

यासाठी सर्वानाच चष्मा वापरावा लागतो. पण चष्मा लावूनही जास्त उजेडाचा त्यांना त्रास जाणवतो. त्यामुळे, शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पुन्हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच चष्मा न लावता पाहता यावे, याकरीता नवीन लेन्स तयार करण्यात आली आहे. नवीन लेन्समध्ये फोकस हा ४० सेंमीपासून लांबवर क्षिजितापर्यंत दिसू शकेल, असा ठेवण्यात आला आहे. याचाच अर्थ सामान्यांच्या नजरेप्रमाणेच याचा आवाका असणार आहे. त्यामुळे, उजेड कितीही असला तरी ते पाहू शकणार आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व नेत्रशल्यचिकित्सा तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

किती असेल ‘लेन्स’ची किंमत

मोतिबिंदू झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना आता नवीन लेन्स बसविण्यात येणार आहे. या लेन्सची किंमत ३६ हजार इतकी आहे. या लेन्सची किंमत प्रचंड असली तरी या रुग्णांनासुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. या लेन्सचा वापर याआधी फक्त अमेरिका, न्यूझीलँड आणि इंग्लंड या देशांमध्येच केला जात होता. परंतु, भारतातही याचा वापर होऊ लागला आहे. प्रश्न केवळ खर्चाचा आहे. कारण, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी येणारे रुग्ण वयोवृद्ध असून ते दूरहून खेडय़ापाडय़ांतून आलेले असतात. कमी खर्चात उत्तम शस्त्रक्रिया हवी, असा त्यामागचा मूळ उद्देश असतो. परंतु, या नवीन लेन्समुळे चष्मा न घालताही पाहता येणार असल्याने शस्त्रक्रियेसोबतच आता नवीन लेन्ससाठी रुग्णांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *