किरकोळ बाजारात टोमॅटोची पन्नाशी!

किरकोळ बाजारात टोमॅटोची पन्नाशी!

दोन महिन्यांपूर्वी कवडीमोल दरामुळे राज्यभरात शेतकऱ्यांनी फेकून दिलेला टोमॅटो आता महागला आहे. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असून, महिन्यापूर्वी प्रतवारीनुसार १० ते २० रुपये किलोने विक्री झालेला टोमॅटो पुणे, मुंबई, ठाणे परिसरात ४५ ते ५० रुपये किलोने विकला जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोची मुबलक लागवड झाली होती. मात्र, मागणी कमी असल्याने टोमॅटोचे दर कोसळले होते. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलो टोमॅटोला गेल्या महिन्यात पाच ते दहा रुपये दर मिळाला होता. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतक ऱ्यांनी टोमॅटो फेकून दिल्याच्या घटना राज्यभरात ठिकठिकाणी घडल्या होत्या. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला असताना कवडीमोल दर मिळाल्याने शेतक ऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले होते.अपेक्षित दर मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतक ऱ्यांकडून लागवड कमी प्रमाणावर करण्यात आली. पितृपक्षात टोमॅटोला फारशी मागणी नव्हती. सध्या मात्र बाजारात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत आहे. त्यामुळे टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

नुकसानीनंतर शेतकऱ्यांना अपेक्षित दर

टोमॅटो उत्पादक शेतक ऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मागणी नसल्याने गेल्या महिन्यात शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता घाऊक बाजारात टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार २५ ते ३५ रुपये दर मिळत आहे. हमाली आणि वाहतूक खर्च वगळून शेतकऱ्यांना एक किलो टोमॅटोमागे २० ते ३० रुपये मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे.

मुंबईठाण्यात आवक घटली

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक परिसरातून टोमॅटोची मोठी आवक होते. मागणीच्या तुलनेत सध्या घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे तसेच उपनगरात किरकोळ बाजारात टोमॅटोची प्रतवारीनुसार ४० ते ५० रुपये दराने विक्री केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *