करोनामुळे पालिकेच्या २४३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पालिकेच्या विविध विभागांतील तब्बल २४३ कर्मचाऱ्यांनी गेल्या दीड वर्षात करोनामुळे आपला जीव गमावला आहे, तर ६,८२५ कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यापैकी १२८ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आतापर्यंत भरपाई देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षांत पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागांतील हजारो कर्मचारी बाधित झाले आहेत, तर २४३  कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्याबरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागांतील कर्मचारी, शिपाई, कर संकलन विभाग, सफाई विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पालिकेचे एकूण एक लाख पाच हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी सहा टक्के कर्मचारी बाधित झाले आहेत. तर ०.२ टक्के कर्मचारी करोना संसर्गामुळे मृत झाले आहेत.

करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात पालिकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना घरापासून दूर मुंबईतच राहावे लागत होते. या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बाधित झाले होते. मृतांमध्ये घनकचरा विभागातील कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक समावेश होता. घनकचरा विभागाच्या ५४ कर्मचाऱ्यांनी, तर आरोग्य विभागातील ४३ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत करोनाने जीव गमावला आहे, तर सुरक्षारक्षक विभागातील १४ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दीड वर्षात पालिकेचे ६,८२५ कर्मचारी बाधित झाले. त्यापैकी ५,८८६ कर्मचारी करोनामुक्त झाले. तर ६९६ कर्मचारी उपचार घेत असून ते अद्याप कर्तव्यावर हजर झालेले नाहीत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत नुकसानभरपाईसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांचे अर्ज केले असता केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचेच अर्ज विमा कंपनीने मंजूर केले आहेत. आतापर्यंत अशा केवळ २० कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळाली आहे.

१२८ कर्मचाऱ्यांना भरपाई

करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या निकट संपर्कांचा शोध घेणे, घरांचे सर्वेक्षण करणे, प्रतिबंधात्मक कामे करणारे, चाचणी, उपचार व मदतकार्ये या पद्धतीचे काम करणाऱ्या महानगरपालिकेतील विविध प्रवर्गांतील कामगार/ कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांचा करोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्यासाठी पालिकेने आपली सानुग्रह अनुदान योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते. आतापर्यंत २२२ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आपले अर्ज पालिकेकडे सादर केले आहेत, तर १२८ कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *