महाराष्ट्र बंदमुळे सोमवारी बेस्ट बस धावू न शकल्याने मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वे स्थानक आणि कार्यालय गाठण्यासाठी करावी लागणारी पायपीट असेच काहीचे चित्र मुंबईत होते. सायंकाळी ४ नंतर हळूहळू बेस्ट बसेस रस्त्यावर धावू लागल्या आणि मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. ११ बसगाडय़ांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. राज्यातील एसटी सेवेवरही परिणाम झाला. सायंकाळी ४ पर्यंत एसटीच्या राज्यातील ३५ टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. काही भागांत एसटी फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.
बेस्ट कामगार सेनेने बंदमध्ये सामील होऊन कामगारांना कर्तव्यावर न येण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्तव्यावर येऊनही कर्मचारी प्रत्यक्षात मात्र सेवेसाठी बाहेर पडलेच नाहीत. सोमवापर्यंत एकू ण ११ बसेसची तोडफोड धारावी, शिवाजी नगर, मानखुर्द यासह मुंबईतील काही भागांत झाली. त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आणि त्यांच्या सूचनेनंतरच बसेस चालवण्यात येतील, असे बेस्ट उपक्र माने स्पष्ट के ले. त्यामुळे आगारातून बसेस बाहेर पडू शकल्या नाहीत आणि तीन ते साडेतीन वाजेपर्यंत सर्वसामान्यांचे हाल झाले. खासगी बसेसही बंद असल्याने अनेकांनी रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडला; परंतु त्याही तुरळकच असल्याने या सेवांच्या चालकांकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूटच केली.
दुपारी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मुंबईतील सर्व आगारांतून ३,४०० बसगाडय़ांपैकी केवळ २५ ते ३० बसेस धावू शकल्या. त्यानंतर हळूहळू बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत एकू ण १,८३३ बसेस धावल्याचे सांगण्यात आले.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४ वाजेपर्यंत राज्यात १८ हजार ९४७ एसटी फेऱ्यांपैकी २ हजार ८८५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
सर्वाधिक रद्द फेऱ्या या लातूर, बुलढाणा, सोलापूर, परभणी, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह अन्य विभागांतील आहेत. मुंबई महानगरातील एसटी सेवांवरही काहीसा परिणाम झाला. मुंबई आगारातून धावणाऱ्या आठ, पालघर विभागांतर्गत येणाऱ्या विविध आगारांतून सुटणाऱ्या १२८ आणि ठाणे विभागांतील विविध आगारांतील १९७ हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
