करोनाकाळात २३ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

करोनाकाळात २३ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळे मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यात २३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली. यात १३ चालक असून त्यानंतर वाहक व विविध विभागांतील कर्मचारी आहेत.

करोनामुळे मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली आणि महामंडळाच्या वाहतुकीवरही निर्बंध आले. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. गेल्या वर्षी दोन महिने वेतन उशिराने झाले, तर यंदाच्या वर्षीही वेतन प्रश्न निर्माण झाला. राज्य सरकारची जरी आर्थिक मदत मिळाली असली तरीही वेळेवर वेतन मिळत नसल्याने समस्या कायम आहेत. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२० पासून ते

फेब्रुवारी २०२१ पर्यंत १२ कर्मचारी आणि मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत ११ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तर चार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ, रायगड, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, धुळे या विभागातील एसटी कर्मचारी आहेत. यात १३ चालकांचा समावेश आहे, तर सहा वाहक, दोन साहाय्यक, एक वाहतूक नियंत्रक आणि एका लिपिकाचा समावेश आहे.

करोनाकाळात एसटीतील २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होणे ही चिंताजनक बाब आहे. वेतन, आर्थिक समस्यांबरोबरच त्यामागील अनेक कारणे असली तरीही कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन महामंडळाच्या वतीने के ले जात आहे. कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी मदत के ली जाईल.  – शेखर चन्ने,

 व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

कामगारांना वेतन वेळेवर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेत. या संदर्भात आम्ही न्यायालयात जाऊन वेतन प्रदान अधिनियम कायद्यानुसार देय तारखेला वेतन द्यावे, असा आदेश प्राप्त करून घेतला आहे. आर्थिक अडचणींमुळे कामगार आत्महत्या करत असताना वेतनाची फाइल मात्र लालफितीत अडकलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान होत आहे. ही गंभीर बाब असून राज्य शासन व एसटी महामंडळाने याची दखल घ्यावी.– संदीप शिंदे, अध्यक्ष, मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *