दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह कापशी येथे आढळला. त्याच्या अंगावर जखमा आणि हळदी कुंकू असल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राकेश केसरे या सहा वर्षीय बालकाचे दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले होते. दोन दिवस शाहूवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. घराच्या दारात खेळत असताना त्या बालकास कुणीतरी फूस लावून पळवून नेले. त्यामुळे पोलीस गावातील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी आरव याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळला. त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या. याशिवाय हळदीकुंकूही लावल्याचे दिसत होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक रवींद्र साळोखे, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील, कोडोली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे, फॉरेन्सिक लॅब श्वानपथक तळ आदी तपास यंत्रणा ठोकून आहे.

