नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी हे आदेश जारी केले आहेत.
उरण तालुक्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची खूप मोठी समस्या आहे. नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, वाहतूककोंडी असते. यात जेएनपीटीमधून निघणाऱ्या अवजड कंटेनर वाहतुकीमुळे सामान्य वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा या अवजड वाहनांना वाहतूक बंदी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र त्याकडे तितके गांभीर्याने पहिले जात नव्हते. आता ठाण्याच्या वाहतूककोंडीची दाखल घेतल्याने जेएनपीटीमधून निघणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडीला चाप बसणार आहे. कारण दिवसा या जड वाहनांना रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर जड वाहने नवी मुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करून गुजरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. या वाहतूककोंडीचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शासन दरबारी अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने या वाहतूक समस्येची दखल घेतली. त्यानुसार सामान्य जनतेच्या सोयीसाठी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी व इतर सर्व प्रकारची जड अवघड वाहनांना नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व शहरांमधील मार्गावरून वाहतुकीस दररोज सकाळी ६ ते रात्री ११ दरम्यान पूर्णतः बंदी करण्यात आली असून या जड अवजड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जीवनावश्यक वाहने, पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. त्यांना यातून सूट देण्यात आली आहे. ही अधिसूचना २५ सप्टेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहील, असे वाहतूक नियंत्रण अधिसूचनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदरच्या अधिसूचनेमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत उरणमध्ये वाहनांच्या अपघातांत अनेक मृत्यू झाले आहेत. रस्ते अपघातांत मृत्यूंची संख्या अधिक आहे. मात्र, नवीन अधिसूचनेमुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील वाहतूककोंडी आता कमी होणार असून अपघाती मृत्यूची संख्यादेखील कमी होण्यास मदत होणार आहे.
