श्रावण महिन्यातील व्रत असल्याने नदीवर स्नानासाठी गेलेल्या पाच महिला पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी वाशिम जिल्ह्यातील गिव्हा गावामध्ये घडली.
यातील मालताबाई भुसारी या महिलेचा मृत्यू झाला असून, इतर चार जणींना वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गिव्हा गावात जलयुक्तशिवार योजनेतंर्गत नदीतील पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे मुबलक पाणी असलेल्या भागात या महिला स्नानासाठी उतरल्या होत्या.
त्यावेळी मालताबाई बुडत असल्याचे इतर महिलांच्या लक्षात आले. त्यांच्या मदतीसाठी चार जणी पुढे गेल्या असता त्या ही बुडू लागल्या. त्यावेळी अन्य महिलांनी मदतीसाठी याचना केल्यानंतर जवळच्या शेतावर काम करणा-या वुध्दांने गावातील युवकांना मदतीसाठी बोलावले. नंतर पाचही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यातील मालताबाईंचा मृत्यू झाला होता. अन्य महिलांवर उपचार सुरु आहेत.

