राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.
दरम्यान मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चिपळूणमध्ये NDRF टीम दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.
२२ जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले खरे, परंतु पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते, त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला फारसे काम राहिले नव्हते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरत असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे.
२२ जुलैसारखी परिस्थिती झाली तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अगोदरच एनडीआरएफची टीम बोलण्यात आली आहे. शहरातील माटे सभागृहात एनडीआरएफच्या टीमचा मुक्काम आहे.
