विरारमध्ये ३१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी भररस्त्यात चाकूने वार करत ही हत्या करण्यात आली आहे. निशांत कदम हे विरार पूर्वेकडील फूलपाडा येथे वास्तव्यास होते. पहाटे ३ वाजता मंदिरात पुजा करण्यासाठी निघाले असता काही अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली आणि फरार झाले. पोलीस सध्या तपास करत आहेत.
आरोपींना आधीपासूनच निशांत कदम यांच्या हालचालींसंबंधी माहिती असावी असा पोलिसांना संशय आहे. झाडामागे लपून ते निशांत कदम येण्याची वाट पाहत होते. निशांत कदम गांधी चौकात पोहोचल्यानंतर त्यांनी अचानकपणे हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ला झाला तेव्हा निशांत कदम एकटेच होते की अजून कोणी सोबत होतं याबाबत माहिती मिळालेली नाही.
निशांत कदम मंदिरात पूजा करण्यासाठी निघाले असताना हा हल्ला झाला. दरम्यान पोलीस सध्या कुटुंबाकडे चौकशी करत असून मंदिरात जाण्यासंबंधी आधीच ठरलं होतं का याची माहिती घेत आहेत. तसंच पहाटे मंदिरात जाणार असल्याचं कोणाला माहिती होतं हेदेखील जाणून घेत आहेत. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहत आहे.
