गोंदियात पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूचीच नोंद

गोंदियात पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूचीच नोंद

गोंदिया जिल्ह्यातल्या सोनारटोला गावातल्या विहिरीत तरुणीचा अर्धवट जळालेला नग्नअवस्थेतील मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबियांनी गावातल्या तंटामुक्त समितीच्या सदस्यांवर आरोप केला आहे.

गावातल्या तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी तरुणीवर बलात्कार करून तिचा मृतदेह जाळला आणि विहिरीत टाकला असा आरोप मृत तरुणीच्या घरच्यांनी केला आहे.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, 8 दिवस उलटूनही पोलिसांनी कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

पीडित तरुणी आणि तिचा भाऊ असे दोघेच गावात राहत होते. गावातून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तंटा मुक्त समिती सदस्य गेले कित्येक महिने तरुणीला त्रास देत होते.

6 महिन्यापूर्वी तरुणीने रोजच्या छेडखानीला कंटाळून सालेकसा पोलीस स्थानकात तक्रारही दिली होती. मात्र, यावेळी पोलिसांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल न करता दोन्ही पक्षाना ते प्रकरण  बाहेरच्या बाहेर मिटविण्यास सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरतीच्या कुटुंबीयांवर दबाव आणत तक्रार केल्याने ‘तुमच्याच मुलीची बदनामी होईल. तिचे लग्न होणार नाही. अशी भीती दाखवत गुन्हा दाखल करण्याऐवजी हे प्रकरण बाहेरच मिटवा.’ असे सांगितले. त्यामुळे तेव्हाच पोलिसांनी माझ्या बहिणीची तक्रार नोंदविली असती तर आज माझी बहिण जिवंत राहिली असती. असं आरतीच्या लहान भावाचा म्हणणं आहे.

या संपूर्ण प्रकरणात सालेकसा पोलीस स्थानकाची भूमिका नक्कीच नियमबाह्य आहे. आता आरतीचा मृत्यू होऊन ८ दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फक्त आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *