ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ दत्तात्रय साठे यांचे सोमवारी दुपारी कल्याणमधील सुभेदारवाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा श्रीरंग, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या चित्रकार पत्नी नेत्रा यांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.

कल्याण शहर भाऊंची जन्म आणि कर्मभूमी होती. शालेय शिक्षण सुरू असताना भाऊंनी त्यांचे काका नानासाहेब साठे यांच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात मूर्ती, आखणी, रंगकाम शिकून घेतले. त्यांनी १९४४ मध्ये जे.जे. कला महाविद्यालयात स्कूल ऑफ आर्ट्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. ‘डिप्लोमा इन मॉडेलिंग अ‍ॅन्ड स्क्लपचर’ ही शासनमान्य पदविका त्यांनी सुवर्ण पदकासह मिळविली.

परळ येथील शांताराम बापूंच्या राजकमल स्टुडिओमध्ये सेट, पुतळे उभारणीची कामे भाऊंना मिळाली. कलेच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण करण्याची जिद्द भाऊंना स्वस्थ बसू देत नव्हती. १९५२ मध्ये नवी दिल्लीत आर्टिस्ट म्हणून २५० रुपये वेतनाची नोकरी केली. या काळात अनेक मातब्बर मंडळींचा सहवास मिळाला. नवी दिल्लीत १९५४ मध्ये महात्मा गांधींचा पहिला पुतळा उभारण्याचा मान भाऊंना मिळाला.

गेटवे ऑफ इंडिया येथील अश्वारूढ पुतळा, कन्याकुमारीच्या शिलाखंडावरील स्मारक, गुवाहटीमधील लासित बारफुकन, नेताजी सुभाषचंद्र बोस, रायगडावरील शिवरायांचे स्मारक, इंग्लंडमध्ये बंकिंगहॅम पलॅसेमध्ये बसून तयार केलेले प्रिन्स फिलिप स्मारक, याशिवाय लॉर्ड माऊंटबॅटन, राणी लक्ष्मीबाई, स्वा. सावरकर, वीर मुरारबाजी, लो. टिळक अशा अनेक शिल्पांनी भाऊंची शिल्पकला देश-विदेशात पोहचली. सॅन्ड कास्टिंगचे नवे शिल्प तंत्र विकसित करून ते इतरांनीही अवलंबावे म्हणून ते शिल्पकारांसाठी खुले केले.

अनेक राष्ट्रीय स्मारक योजनांमध्ये भाऊंचा सहभाग होता. सोव्हिएत रशियामध्ये भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. देश-विदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शिल्प प्रदर्शने भरवली होती.

ऋजू, अबोल आणि विनम्र असा त्यांचा स्वभाव होता. ‘शिल्पकला इतर कलांसारखी विलक्षण आणि प्रतिष्ठित कला आहे. या कलेविषयी समाज मनात असलेली उपेक्षेची भावना दूर झाली पाहिजे, शिल्पकलेविषयी समाज जेव्हा विचार करायला लागेल, तेव्हा नवनिर्मितीचा कालखंड सुरू होईल’, असे ते नेहमी सांगत असत.

भाऊंनी डोंबिवली एमआयडीसीत सदाशिव साठे शिल्प प्रतिष्ठानतर्फे शिल्पालय सुरू केले. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव पुरस्कार, बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार, म. गांधींच्या पुतळ्यासाठी १९५४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक अशा अनेक पुरस्कारांनी भाऊंना गौरविण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *