करोडपती हेड कॉन्स्टेबल!

बातमी आहे एका करोडपती पोलीसाची. मुंबईतल्या एका हेड कॉन्स्टेबलची (Mumbai Police) वर्षाची कमाई तब्बल दीड कोटींच्या घरात आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? झटका लागला ना? हो, पण हे खरं आहे. नक्की कोण आहेत हे हेड कॉन्स्टेबल (Head Constable) आणि त्यांच्या कमाईचं नक्की रहस्य काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

फोटोत अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bacchan) यांच्या बाजुला दिसतायत ते आहेत मुंबईतले हेड पोलीस कॉन्स्टेबल (Jitendra Shinde) जितेंद्र शिंदे. हेड कॉन्स्टेबल असल्यानं त्यांचा महिन्याचा पगार 50 हजारांच्या आसपास असला पाहिजे. पण हे महाशय किती कमावतात माहितीये ? त्यांची महिन्याची कमाई आहे तब्बल साडेबारा लाख आणि वर्षाला ते दीड कोटी कमवतात. कारण ते आहेत बिग बी यांचे (Amitabh Bacchan Bodyguard) सुरक्षा रक्षक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सेलिब्रेटींच्या रक्षकांना असा भरघोस पगार असतो का? तर तसंही नाहीये.

पत्नीच्या नावानं सुरक्षा एजन्सी 

शिंदे यांच्या पत्नीच्या नावानं सुरक्षा एजन्सी आहे. बिग बी यांना त्यांचीच कंपनी सुरक्षा पुरवत असते. याशिवाय शुटिंगवेळी दिवसाला 4 हजार ते 8 हजार रुपये निर्मात्याकडून मिळतात.एका दिवशी 4 ठिकाणी शूटिंग असेल, तर चारही निर्मात्यांकडून अशीच भरघोस रक्कम मिळते.

सेलिब्रिटींसोबत उठबस असल्यानं हे सुरक्षारक्षक इतरांची कामंही करून देतात. त्यामुळे सेलिब्रेटींचा सुरक्षा रक्षक होणं आणि ते कायम टिकवण्यासाठी खटपट केली जाते. मात्र यासाठी वरिष्ठांचा आशीर्वाद लागतो. सेलिब्रेटीदेखील तोच सुरक्षा रक्षक मिळावा यासाठी प्रयत्न करतात.

जितेंद्र शिंदे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या कमाईचा मुद्दा पुढे आलाय. यामुळेच त्यांची अनेक वर्षे बदली झाली नसल्याचं वरिष्ठ अधिकारी सांगतायत. त्याची चौकशीही केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या निमित्तानं बड्यांचा सुरक्षा रक्षक होणं म्हणजे कोट्यवधींच्या कमाईचं घबाड हाती लागण्यासारखंच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *