चिंता वाढली!, देशात एका दिवसात ४६ हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद

चिंता वाढली!, देशात एका दिवसात ४६ हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद

देशात करोनाचं संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केरळमध्ये करोना रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत सरकारने उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शुक्रवारी लसीकरणात ६० कोटींचा टप्पा गाठला. मात्र करोनावरील दोन लस घेतल्या असल्या तरी नागरिकांना नियम पाळण्याची विनंती केली जात. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान शनिवारी ४६ हजार ७५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर एका दिवसात ५०९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. करोनामुळे देशात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

करोनावर मात करण्यासाठी आतापर्यंत देशात सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, झायकोव्ह-डी, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *