रुग्णास पालथे झोपवल्याने कृत्रिम प्राणवायूची गरज कमी

रुग्णास पालथे झोपवल्याने कृत्रिम प्राणवायूची गरज कमी

करोना झालेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असतो, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अवस्थेत हलवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यांना पोटावर (पालथे) झोपवल्याने कृत्रिम प्राणवायूची गरज कमी भासते. त्यात त्यांचा चेहरा जमिनीच्या दिशेने असला पाहिजे, असे लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीन जर्नलने म्हटले आहे.

एकूण सहा देशांत याबाबत संशोधन झाले असून ११०० रुग्णांना नाकाच्या वाटे कृत्रिम प्राणवायू दिला जात होता. पण त्यांना पालथे झोपवल्याने प्राणवायूची आवश्यकता कमी झाली. अमेरिका, मेक्सिको, फ्रान्स, कॅनडा, आर्यलड व स्पेन या देशांत कोविडच्या रुग्णांवर एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात प्रयोग करण्यात आले. पालथे झोपून श्वास घेतल्याने फुप्फुसे जास्त कार्यक्षमतेने काम करतात, असे युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे जी ली यांनी म्हटले आहे. प्राणवायूची गरज असलेले रुग्ण पोटावर झोपतात, तेव्हा रक्तप्रवाह व फुप्फुसाला मिळणारा प्राणवायू यांचा समतोल वाढून रक्तात प्राणवायूचा पुरवठा वाढतो. त्यामुळे रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची फारशी गरज लागत नाही. पण त्यामुळे इतर लक्षणांवर परिणाम होतोच असे नाही. समांतर पातळीवर पोटावर झोपल्याने व चेहरा जमिनीच्या  दिशेने ठेवल्याने अनेक रुग्णांना फायदा झाल्याचे दिसून आले आहे. जितके शक्य आहे तितका काळ या अवस्थेत झोपल्यास जास्त फायदा झाल्याचे दिसून आले. कारण त्यांना या अवस्थेत झोपल्याने जास्त प्राणवायू मिळतो.

पालथ्या अवस्थेतील रुग्णांना उताणे झोपलेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी प्राणवायू लागतो. त्याची गरच अनुक्रमे ३३ टक्के आणि ४० टक्कय़ांनी कमी होते.  फ्रान्सच्या सेंटर फॉर हॉस्पिटलियर रिजनल युनिव्हर्सिटीचे स्टीफन अहरमन यांनी सांगितले की, पालथे झोपल्याने ज्यांना प्राणवायूची जास्त गरज असते, त्यांना आपोआप फायदा होतो.

कारण त्यांना जास्त प्राणवायू मिळत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *