जिथे फुले, तिथेच गोवऱ्या वेचण्याची परिस्थिती उद्भवलेल्या दिवंगत माजी उपमहापौर तथा यंत्रमाग कारखानदाराच्या वृद्ध विधवा पत्नीला दैनंदिन उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोन्ही मुलांनी पोटगी देण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांनी दिला आहे.
सरोजिनीबाई नारायणराव पिठ्ठा (वय ६८, रा. अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) यांनी पोटगी मिळण्यासाठी आपली दोन्ही मुले श्रीनिवास आणि भास्कर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊ न ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियम २००७ मधील तरतुदींच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी निकम यांनी सरोजिनीबाईंच्या बाजूने निकाल दिला.
त्यानुसार दोन्ही मुलांना दरमहा चार हजार रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. याशिवाय दिवंगत नारायणराव पिठ्ठा यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या मालकीच्या ४४ यंत्रमागांपैकी आठ यंत्रमागांचे भाडेही सरोजिनीबाईंना त्यांच्या मुलांनी द्यावयाचे आहे.
एके काळी शहराच्या पूर्वभागात विविध सहकारी संस्थांवर प्रतिनिधित्व केलेले यंत्रमाग कारखानदार तथा माजी उपमहापौर नारायणराव पिठ्ठा यांचे २५ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले होते. त्यांना पत्नीसह तीन मुली व दोन मुले आहे. मुले-मुली विवाहित आहेत.
मुले आईपासून विभक्त असून एका मुलीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह आपल्या आईकडे राहते. दोन्ही मुले सांभाळ करीत नसल्यामुळे आई सरोजिनीबाई यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियमाचा आधार घेऊ न दोन्ही मुलांकडून पोटगी मिळण्यासाठी २०१९ साली उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती.
त्यावर सुनावणी होऊ न दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. दोन्ही मुलांनी आपल्या आईची आर्थिक परिस्थिती पोटगी द्यावी एवढी नाजूक नसल्याचे म्हणणे मांडले होते. परंतु ते फेटाळण्यात आले.