आपला जीव धोक्यात घालून अफगाणिस्तानमधून भारतीयांना आपल्या देशात परत आणणाऱ्या विमानातील चालक सदस्यांसह हवाई सुंदरी श्वेता चंद्रकांत शंके हिच्या कामगिरीने दर्यापूरमध्ये आनंद व्यक्त के ला जात आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने अफगाणिस्तानात अडकलेल्या १२९ भारतीयांना रविवारी सुखरूप परत आणण्यात आले. या विमानातील चालक दल सदस्यांमध्ये हवाई सुंदरी श्वेता शंके हिचा समावेश असल्याची वार्ता ऐकू न तिच्या मूळगावी दर्यापुरात तिच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
श्वेता शंके ही मूळची दर्यापूरची. बाभळीतील शिवाजी चौकामध्ये तिचे घर आहे. तिचे वडील जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बहीण दर्यापुरातच दंतरोग तज्ज्ञ आहे व भाऊ फार्मासिस्ट आहे. श्वेता शंके हिची २०१८ मध्ये हवाई सुंदरी म्हणून निवड झाली. प्रशिक्षण संपल्यानंतर ती इंडियन एअरलाईन्समध्ये कार्यरत झाली. सध्या ती दिल्ली येथे सेवा देत आहे. भारतातील दुतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अफगाणिस्तानात अडकलेल्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान भारतात यशस्वीपणे दाखल झाले. एआय २४४ या विमानाने काबूल विमानतळाहून अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा उड्डाण घेतले. या विमानाच्या चालक दल सदस्यांमध्ये श्वेताचा समावेश होता. दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून या विमानाने रविवारी दुपारी १२.४५ ला लाहोरमार्गे काबूलकडे उड्डाण केले होते. विमान उतरवण्यासाठी बऱ्याच उशिराने परवानगी मिळाली होती. जीवाला धोका असल्याने कुणालाही विमानाच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. अत्यंत खडतर परिस्थितीत काबूलवरून या विमानाने उड्डाण के ले आणि ते दिल्लीला पोहचले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. यशोमती ठाकूर यांनी फोन करून श्वेतासोबत संवाद साधला. काहीही आवश्यकता भासली तर हक्काने फोन कर, तुझी सेवा देशासाठी महत्त्वाची ठरली, असे सांगून यशोमती ठाकूर यांनी श्वेताचे अभिनंदन के ले. काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाईन्स विमान तेथे उतरले, त्यावेळी गोळीबाराचे आवाज येत होते, असे श्वेताने यशोमती ठाकूर यांना सांगितले.