जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा

जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा

ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या यात्रेमध्ये करोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दुजोरा दिला आहे.

नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण,  ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे आणि संघटन सरचिटणीस विलास साठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन ठाणे जिल्ह्यात करण्यात आले आहे. सोमवारी ठाणे शहरातून या यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा कोपरी-आनंदनगर, तलावपाली, खोपट, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर रोड या भागांतून काढण्यात आली होती.

या यात्रेमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.यामुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. या यात्रेमध्ये काही कार्यकर्त्यांनी मुखपट्ट्या लावल्या नव्हत्या.  या यात्रेमध्ये करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले होते. ही जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब  कारवाईतून आता पुढे आली आहे. याप्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये विनापरवाना यात्रा काढणे, मंडप उभारणे आणि करोना नियमांचे उल्लंघन करणे असा पदाधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *