दुसरी लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या पासधारक प्रवाशांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली असली, तरी नैमित्तिक प्रवासासाठी तिकीट काढून प्रवास करू इच्छिणाऱ्यांची मात्र अडचण कायम आहे. रेल्वे स्थानकांवर केवळ पासधारकांनाच प्रवासाची सुविधा देण्याचे जाहीर केले गेले असतानाही सोमवारी, पहिल्याच दिवशी अनेक जण तिकीट खिडक्यांवर जाऊन एकमार्गी वा परतीच्या तिकिटासाठी विचारणा करत होते. दरम्यान, सामान्यांसाठी लोकल खुल्या झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली, परंतु पारसी नववर्षानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे गर्दीचा प्रत्यक्ष परिणाम मंगळवारपासून दिसू लागेल.
करोना प्रतिबंधात्मक लशीची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारच्या तुलनेत सोमवारी लोकल गाड्यांना सकाळच्या सुमारास काहीशी गर्दी वाढली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकात पालिके चे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी मदत कक्ष सुरू होते. गर्दीच्या स्थानकातील प्रत्येक मदत कक्षांवर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली होती. सोमवारीही अनेक जण मदत कक्षावर येऊन प्रमाणपत्र पडताळणी करून त्वरित स्थानकातील तिकीट खिडक्यांवर जाऊन लोकलचा पास घेऊन लोकल प्रवासही करत होते. काही सामान्य प्रवासी तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना तिकीट उपलब्ध होते का, कधीपासून होऊ शकते, अशी विचारणा करत होते.
अनेक नोकरदार किंवा व्यावसायिकांना अधूनमधून रेल्वे प्रवास करावा लागतो, मात्र लसीकरणाची पात्रता पूर्ण करूनही त्यांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे नाइलाजाने अनेकांना महिन्याचा पास घ्यावा लागत आहे. याबद्दल तिकीट खिडक्यांवर प्रवासी नाराजी व्यक्त करत होते.
पासविक्रीत वाढ
मध्य रेल्वेवर ११ ते १५ ऑगस्ट या काळात एकू ण ९२ हजार ३२४ पासची विक्री झाली. डोंबिवली स्थानकात सर्वाधिक आठ हजार ५६१ पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवरही एकू ण ४४ हजार ४८७ पासची विक्री झाली असून यात बोरिवली स्थानकातून सर्वाधिक पास खरेदी होत आहेत. सोमवारी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत वातानुकू लित लोकलचे ३३ पास, द्वितीय श्रेणीचे पाच हजार ७६४ पास आणि प्रथम श्रेणी प्रवासाचे ९९८ असे सहा हजार ७९५ पास खरेदी केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
पासचा नाहक भुर्दंड
ठाण्यात राहणारे व दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस उलटलेले लालचंद्र कु मावत यांनी प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेतला. ठाण्यात स्टेशनरीचे दुकान असून मुंबईतून आठवड्यातून एक किं वा दोन वेळा घाऊक बाजारातून विक्रीच्या वस्तू आणाव्या लागतात. महिन्यातून सात ते आठ वेळाच जाणे-येणे होणार असल्याने तिकिटाबाबत विचारणा केली, मात्र तशी सुविधा नसल्याने पास काढावा लागला, असे ते म्हणाले.
तिकीट तपासनीसांच्या संख्येत वाढ
प्रवाशांना मार्गदर्शन करणे, विनातिकीट किं वा अवैधरीत्या लोकल प्रवाशांवर कठोरपणे कारवाई करणे इत्यादींसाठी सोमवारपासून पहिल्या पाळीत १२२ तिकीट तपासनीस विविध स्थानक व लोकल गाड्यांत तैनात करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. मध्य रेल्वेनेही स्थानकात व लोकल गाड्यांत तिकीट तपासनीसांचे मनुष्यबळ वाढविले आहे.
महत्त्वाच्या कामानिमित्त जाणारे, तसेच काही छोटे व्यापारी आणि ज्यांना खासगी कार्यालयात आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच बोलावण्यात येते, अशा नागरिकांना पास काढावा लागत आहे. सामान्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांना लोकल प्रवास वेळेची मर्यादा निश्चित करून तिकीट सुविधा उपलब्ध करावी ही मागणी राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाकडे करणार आहोत. – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था