ऐन श्रावणात फुलांच्या बाजारात शुकशुकाट

व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावण महिन्यात दरवर्षी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी या महिन्यात मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांत फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात होत असते. मात्र, यंदा हे चित्र पालटल्याचे दिसून येत आहे. करोनाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे राज्य शासनाच्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. याचा परिणाम फुलांच्या विक्रीवर होत आहे. यामुळे यंदा फुलांची आवक होत असली तरी ग्राहकांकडून फुले खरेदीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

डहाणू, जुन्नर, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणांहून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी फुले येतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असल्यामुळे मंदिरात तसेच घरोघरी पूजा-अर्चा, धार्मिक विधी करण्यात येतो. यामुळे दरवर्षी या कालावधीत फुलांना विशेष मागणी असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात फुलांची आवक होत असते. शिवाय मागणी जास्त असल्यामुळे या कालावधीत फुलांचे दरही वधारलेले असतात. यंदा झेंडू, शेवंती, निशिगंधा, अष्टर आणि गुलाब या फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. मात्र, करोनाचे सावट अद्यापही कायम असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांना बंदी घालण्यात आली आहे.

यंदा फुलांच्या मागणी ५० टक्क्य़ांनी घट झाली असून दररोज ३० टक्के उरलेली फुले कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत. यामुळे ऐन हंगामात आर्थिक नुकसान होत असल्याचे ठाण्यातील फुलविक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. किरकोळ बाजारात ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे झेंडूची फुले यंदा ३० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. १२० रुपये प्रति किलोने विकली जाणारी शेवंती सद्यस्थितीला ३० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. १६० रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे अष्टर सध्या ८० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. तर, १२० रुपये प्रति किलोने विकले जाणारे गुलाब सध्या ४० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे, अशी माहिती ठाण्यातील योगेश पाटील या विक्रेत्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *