कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावरील एका दारूच्या दुकानात रात्रीच्या वेळेत घुसून चोरट्यांनी ६८ हजार रुपयांची महागडी दारू चोरून नेली. त्याचबरोबर दुकानाच्या गल्ल्यात असलेली लाखो रुपयांची रक्कम पळवली. गटारीच्या दोन दिवस अगोदर चोरट्यांनी ही चोरी केली असल्याने ही दारू चोरट्या मार्गाने विकली जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
उल्हासनगर येथील रहिवासी नरेंद्र दासवानी यांचे कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर मनीष वाइन शॉप दुकान आहे. सर्व प्रकारच्या दारूचे प्रकार ते विक्रीसाठी ठेवतात. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत दुकानाचे प्रवेशद्वार तोडून दुकानात प्रवेश केला. महागड्या दारूसह इतर प्रकारच्या दारूच्या बाटल्या गोणीत भरल्या. ६८ हजार रुपयांची दारू चोरट्यांनी चोरून नेली, अशी तक्रार दासवानी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.